मुंबई : तक्रारदार व्यावसायिक हा त्याचा मित्र क्रिकेटर पृथ्वी शाॅसोबत सहारा स्टार हाॅटेल मेन्शन क्लब डोमेस्टीक विमानतळ सांताक्रुझ येथे गेले होते. त्यावेळी आरोपी सना गिल व शोबित ठाकूर यांनी पृथ्वी शाॅसोबत सेल्फी काढण्याचा आग्रह केला. पृथ्वी शाॅसोबत सेल्फी काढल्यानंतर पुन्हा सेल्फी काढण्यास दोघांनी आग्रह केल्याने हाॅटेल मॅनेजरने दोन्ही आरोपींना हाॅटेलबाहेर काढले. याचा राग मनात धरून आरोपींनी पृथ्वी शाॅची गाडी जोगेश्वरीच्या लोटस पेट्रोल पंप समोर, लिंक रोड येथे अडवली. आरोपी आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर आरोपींनी तक्रारदाराची गाडी बेसबाॅल स्टीकने फोडली. याप्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी : सुदैवाने पृथ्वी शाॅ त्या गाडीत नव्हता. त्यानंतर आरोपींनी व्यावसायिकाकडे प्रकरण मिटवण्यासाठी ५० हजाराची मागणी केली. पैसे न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी व्यावसायिकाला दिली. फोडलेली गाडी घेऊन व्यावसायिकाचा चालक ओशिवरा पोलिस ठाण्यात आल्यानंतर व्यावसायिकाच्या तक्रारीवर पोलिसांनी आरोपी सना गिल व शोबित ठाकूरवर कलम 384,143, 148,149, 427,504, 506, भादवि अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी ओशिवरा पोलिस अधिक तपास करत आहेत.
सर्वात तरुण फलंदाज :पृथ्वी शॉ हा एक भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय अंडर-19 क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. त्याचा जन्म 9 नोव्हेंबर 1999 रोजी झाला. पृथ्वी शॉ हा भारताचा सर्वात तरुण फलंदाज आहे. पृथ्वीने पहिले कसोटी शतक ९९ चेंडूत झळकावले आहे. पृथ्वी शॉ न्यूझीलंडच्या भूमीवर कसोटी सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारा भारताचा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. शॉला आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी पूर्ण दर्जा देण्यात आला आहे.