मुंबई -ठाणे जिल्ह्यातील आधारवाडी कारागृहातून भिंतीवरील सीसीटीव्ही वायरच्या सहाय्याने पलायन करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 4 ने अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी डेव्हिड मुर्गेश देवेंद्र उर्फ विनायक या 36 वर्षीय आरोपीला नवी मुंबईतील उलवे इथून अटक केली आहे.
सीसीटीव्ही वायरच्या सहाय्याने कारागृहाची भिंत ओलांडली -
अटक करण्यात आलेला आरोपी डेविड मुर्गेश देवेंद्रला आधारवाडी कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. 23 एप्रिलला कारागृहातील सीसीटीवी वायरच्या सहाय्याने कारागृहाच्या भिंतीवर चढून सदरचा आरोपी पळून गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून सदरचा आरोपी नवी मुंबईतील उलवे येथे स्वतःची ओळख लपून राहत असल्याचं समोर आल्यानंतर उलवे परिसरामध्ये सापळा रचून या आरोपीला अटक करून त्याची चौकशी केली असता या आरोपीवर जबरी चोरी , घरफोडी व चोरीचे एकूण 15 गंभीर गुन्हे महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे समोर आलेला आहे.
कारागृहातून पळून गेल्यानंतर केल्या 11 घरफोडी , खुनाचा प्रयत्न -
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आधारवाडी कारागृहातून पळून गेल्यानंतर आरोपीने कन्याकुमारी, तामिळनाडू येथे जाऊन तब्बल 11 घरफोड्या व खुनाचा प्रयत्न केला, हे गुन्हे करून तो पुन्हा नवी मुंबईत आल्याचे त्याने कबूल केलेले आहे. याबरोबरच तामिळनाडूमधील अंजूग्राम पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एका घरफोडीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असतानाही हा आरोपी पळून गेला होता, अशी माहिती तपासाअंती समोर आली आहे.