मुंबई :मुंबईतील अँटॉप हिल येथील दुचाकीचे गॅरेज व्यावसायिक अब्दुल मन्सुरी जुनी मालमत्ता विकून मिळालेल्या पैशातून घर खरेदी केले होते. त्यांचा आयकर फाइल्स क्लिअर करण्यासाठी लाच मागितल्याबद्दल आयकर अधिकारी आणि अकाउंटंटला विशेष सीबीआय न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तक्रारदार अब्दुल मन्सुरी हे मुंबईतील अँटॉप हिल येथे दुचाकीचे गॅरेज चालवत होते. ते आणि त्यांची पत्नी फरजाना 2009 ते 2010 या कालावधीत कर सल्लागार मेहबूब शेख यांच्यामार्फत आयटीआर भरत होते.
काय होते प्रकरण ?तक्रारदाराने 2010 मध्ये खारघर सेक्टर 35 मध्ये स्वत:च्या आणि पत्नीच्या संयुक्त नावाने फ्लॅट खरेदी केला होता. नोव्हेंबर 2012 मध्ये त्यांनी 20 लाख रुपयांना फ्लॅट विकला. त्यानंतर तक्रारदाराने उर्वरित विक्रीच्या रकमेतून कुर्ला येथे दुसरा फ्लॅट खरेदी केला. सप्टेंबर 2013 मध्ये तक्रारदाराने त्यांच्या मालमत्तेची कागदपत्रे आणि पासबुक शेखला ITR भरण्यासाठी दिले आणि त्याला 7 हजार रुपये फी देखील दिली होती. शेखने तक्रारदाराशी संपर्क साधला की, त्यांनी 2013 ते 2014 चे रिटर्न भरले होते; परंतु सत्यनारायण वनम नावाच्या आयकर अधिकाऱ्याने त्यांची फाईल मार्गी लावण्यासाठी लाच मागितली होती. असे न केल्यास त्यांना 1.70 लाखांचा दंड ठोठावला होता.
आरोपीला पकडण्यासाठी रचला सापळा :तक्रारदाराने पैसे देण्यास नकार दिला आणि दंड भरण्याचा निर्णय घेतला. शेखने पुढे वामनला 50 हजार रुपये देण्याचा आग्रह धरला; त्यासाठी एक बैठकही आयोजित केली होती. तक्रारदाराला हे मान्य नव्हते. म्हणून त्याने 12 डिसेंबर 2013 रोजी सीबीआयशी संपर्क साधला. त्याची तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयने आरोपांची पडताळणी केली. त्यानंतर अधिकारी शेखला रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. या दोघांना 14 डिसेंबर 2013 रोजी अटक करण्यात आली होती.