मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेने(मनसे)ने हिंदुत्व स्वीकारले आहे. मात्र, भाजपची मराठी भाषिकांबरोबरच अमराठी भाषिकांबाबतची भूमिका त्यांनी स्वीकारलेली नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मांडली. त्यामुळे राज्यात भाजप आणि मनसेमधील नव्या युतीची नांदी होईल, या चर्चेला सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे.
आगामी काळात राज्यात विविध प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांची प्रतीक्षा सर्वच राजकीय पक्षांना आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेल्या या महानगरपालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व असून ही पालिका काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी भाजप येत्या काळात मनसेसोबत युती करू शकते, अशी जोरदार चर्चा आहे. मनसे आणि भाजपकडून त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही समोर आले आहे.