मुंबई :पोलीस दलातील माजी सहाय्यक पोलीस अधिकारी मोहम्मद जावेद अब्दुल रशीद शेख (72) यांचा काल रात्री अपघात झालाय. याबाबत शिवडी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक कमलेश पाटील यांनी सांगितलं की, मुजावर काकडे रोडवर शेख फेरफटका मारत होते. त्यावेळी त्यांना एक टॅक्सीनं जोरदार धडक दिली. या प्रकरणी टॅक्सी चालकाला अटक करण्यात आली असून शिवडी पोलिसांनी कलम 279, 338, 304 (अ) 184 नुसार गुन्हा दाखल केलाय.
उपचारादरम्यान मृत्यू : आज शेख यांच्यावर नारियलवाडी कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. शेख हे 1974-76 च्या तुकडीचे पोलीस अधिकारी होते. काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांना टॅक्सीनं धडक दिली होती. यानंतर त्यांना तात्काळ जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
टॅक्सी चालकाला अटक :या प्रकरणी शिवडी पोलिसांनी टॅक्सी चालक सुधीर कुमार केशव प्रसाद शर्मा (वय 40) याला अटक केली आहे. आरोपी सुधीर शर्मानं बेदरकारपणे गाडी चालवून मोहम्मद जावेद अब्दुल रशीद (वय 72) यांना धडक दिली होती. त्यात शेख यांचा उपचारादम्यान मृत्यू झालाय.
राज ठाकरेंच्या मारेकऱ्याचं एन्काउंटर : शेख एक कार्यक्षम पोलीस अधिकारी, उर्दूतील लघुकथा लेखक, एक अप्रतिम मॅरेथॉन धावपटू होते. त्यांनी 27 ऑक्टोबर 2008 रोजी राज ठाकरे यांना मारण्यासाठी आलेल्या राहुल राजचं एन्काउंटर केलं होतं. राहुल राज हा युवक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्यासाठी पाटणातून मुंबईत आला होता.
हेही वाचा -
- शरद पवारांनी स्वीकारलं बच्चू कडूंचं निमंत्रण, बच्चू कडू महाविकास आघाडीत?
- राहुल गांधींच्या 'भारत न्याय यात्रे'द्वारे काँग्रेस काय साध्य करणार?
- मराठा आंदोलनाचा राम मंदिर सोहळ्याशी संबंध नाही - मनोज जरांगे