मुंबई :महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून भाजप, शिवसेना शिंदे गटाचे युतीचे सरकार कार्यरत आहे. त्यात आता अजित पवार गटही आघाडी सरकारमध्ये सामील झाला आहे. आज खातेवाटप झाल्यामुळे राज्यात प्रशासकीय कामांना वेग येणार आहे. अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन खाते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती आणि तंत्रज्ञान, माहिती आणि जनसंपर्क, वाहतूक, सामाजिक न्याय, पर्यावरण आणि हवामान बदल, खाणकाम आणि इतर कोणतेही मंत्रीपद आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, कायदा आणि न्याय, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, ऊर्जा आणि राजशिष्टाचार ही खाती आहेत.
अजित पवारांचीकामाला सुरुवात : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाची पद्धत अख्या महाराष्ट्राला माहीत. आज अजित पवारांनी वित्त, नियोजन विभागाच्या सद्यस्थितीची माहिती, कामकाजाचा आढावा घेतला. मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरील 503 क्रमांकाच्या दालनातून ते आपल्या विभागचे कामकाज पाहणार आहेत. महायुती सरकारच्या नवीन मंत्र्यांच्या खातेवाटपात फेरबदल करून तिढा सुटला आहे. दिल्लीतून तिन्ही पक्षांना खातेवाटपात योग्य न्याय दिल्याने तिन्ही पक्षातील नाराजी दूर केल्याचे बोलले जात आहे.
प्रशासकीय कामांना गती : सध्या राज्यात महायुती सरकारकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे कामांना गती येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गेल्या दहा दिवसांपासून महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप थांबाले होते. त्याचा परिणाम राज्यातील प्रशासकीय कामावर पडत होता. त्यामुळे विरोधकांनी शिंदे, भाजप सरकारवर जोरदार टीका केली होती.
मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षांची निवड होणार : राज्यातील मंत्रिमंडळ अस्थिरतेमुळे अनेक मंत्रिमंडळ उपसमित्यांची पुनर्रचना रखडली होती. या उपसमित्यांच्या अध्यक्षांच्या निवडीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री या उपसमित्यांचे अध्यक्ष आहेत. मात्र, सध्या राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे अध्यक्ष कोण होणार हे ठरलेले नाही. या कारणास्तव उपसमित्यांच्या बैठका होत नव्हत्या, त्यामुळे उपसमित्यांचे अनेक प्रस्ताव मंजुरीविना पडून आहेत.