मुंबई : आरोपी मोहम्मद आरिफ याने पीडित शबाना परवीनची बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावली आहे. या प्रकरणी शबाना परवीन यांच्या तक्रारीवरून आरिफविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शबाना परवीन यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हेना, सलमान आणि आरिफ यांना या गुन्ह्यात आरोपी बनवले. बनावट कागदपत्रे बनवून जमीन बळकावल्याचा आणि खंडणीची मागणी केल्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आला आहे.
पानटपरीवरून घेतले ताब्यात : या फसवणुकीच्या गुन्ह्यात उत्तर प्रदेश पोलीस आरिफच्या मागावर बऱ्याच दिवसांपासून होते. तो मुंबईत लपून बसल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली. याआधारे तेथील पोलिसांनी मुंबई पोलिसांना आरिफबाबत माहिती देत मदत मागितली. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले. आरिफ वांद्रे येथील एका हॉटेलजवळील पान टपरीवर उभा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक मुंबई पोलिसांसोबत साध्या वेशात त्याठिकाणी गेले आणि आरिफला ताब्यात घेतले.