मुंबईAbu Azmi Reaction : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावर राज्यभर मराठा समाज बांधवांकडून आंदोलनं, उपोषण आणि निदर्शने केली जात आहेत. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय आमदार नेत्यांची बैठक आयोजित केली होती. सर्वपक्षीय बैठकीला समाजवादी पार्टीला निमंत्रण दिलं नसल्यानं आमदार अबू आजमी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच आपण मराठा समाजाच्या आरक्षणाला समर्थन देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षणाला आमचं समर्थ : समाजातील सर्वच घटकांना न्याय मिळाला पाहिजे. राज्यात मराठा समाजाच्या वतीनं आरक्षण मिळविण्यासाठी मागणी केली जात आहे. फडणवीस सरकारनं विधानसभेमध्ये 16 टक्के मराठ्यांसाठी आणि 5 टक्के आरक्षण मुस्लिम समाजाला मान्य करण्यात आलं होतं. मग आम्ही मराठा समाजाच्या बरोबर आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. त्यासोबतच मुस्लिम समाजाला देखील पाच टक्के आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाजाचे मी अभिनंदन करतो की, ज्यांनी आपली मागणी एकीच्या बळातून दाखवून दिली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय आमदारांची बैठक बुधवारी शिंदे सरकारने बोलावली होती. मात्र समाजवादी पक्षाला या बैठकीचे निमंत्रण दिलं गेलं नव्हतं. मात्र काही हरकत नाही आमचा आवाज मराठा समाजाबरोबर असल्याचं मत, आमदार अबू आजमी यांनी व्यक्त केलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही समर्थन करतो, त्यासोबतच मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा देखील विचार करावा अशी मागणी, अबू आजमी यांनी केली आहे.