मुंबई - समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी 'वंदे मातरम'बद्दल केलेल्या वक्तव्यावरून भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी केलेल्या गदारोळामुळे बुधवारी महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. औरंगाबादमधील दंगलीचा उल्लेख करुन आझमी म्हणाले की, 'वंदे मातरम'चा आपण आदर करतो मात्र त्याची घोषणा करणे आपल्याला मान्य नाही. ते म्हणाले, 'काही लोक म्हणतात की तुम्हाला भारतात राहायचे असेल तर तुम्हाला वंदे मातरम म्हणावेच लागेल. आम्ही ते करू शकत नाही, कारण आमच्या धर्माला ते मान्य नाही. आम्ही फक्त आल्लाच्यापुढे नतमस्तक होतो.
कुणापुढेही डोके टेकवू शकत नाही -सदनातून बाहेर आल्यानंतर अबू आझमी माध्यमांशी बोलत होते, ते म्हणाले की, जेव्हाही सदनामध्ये वंदे मातरम् गायले जाते, तेव्हा मी उभा राहून त्याचा आदर करतो. पण मी ते म्हणू शकत नाही. कारण माझ्या धर्मात असे म्हटले आहे की, ज्या अल्लाहने जमीन निर्माण केली, त्यानेच आकाश, सूर्य घडवले, चंद्र घडवले, माणूस घडवले आणि सारे जग घडवले. त्याच्या शिवाय आपण कुणापुढेही डोके टेकवू शकत नाही, असे माझ्या धर्मात म्हटले आहे. मी तुमचा अपमान करत नाही. सर्वोच्च न्यायालयाने हा अधिकार दिला आहे, असे ते म्हणाले.