मुंबई:राज्य सरकारने धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत मार्गदर्शक तत्वे ठरवण्यासाठी सर्वपक्षीयांची आज बैठक बोलावली आहे. या सर्वपक्षीय बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहभागी होणार नाहीत या बैठकीला मनसेकडून माजी आमदार बाळा नांदगावकर आणि मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे उपस्थित राहणार आहेत. गुढीपाडवा मेळाव्यात राज्यातील मशिदीवरील भोंगे न उतरवण्यास समोर हनुमान चालीसा लावू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.
३ मे पर्यंत भोंगे उतरवा, अन्यथा मनसे हे भोंगे उतरवेल, असे विधान राज ठाकरे यांनी केले होते. देशभरातील हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी राज्य सरकारने नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या नेतृत्वाखाली धोरण आखण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.