मुंबई- वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर आणि अकोल्यातील उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणार नाही, असे आम आदमी पक्षाने (आप) गुरुवारी स्पष्ट केले. वंचित आघाडीशी समविचारी असलेल्या आपने पाठिंबा नाकारुन सोलापुरात आंबेडकरांना चांगलाच झटका दिला असून यासोबत राज्यातही आपने इतर उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
या महत्त्वाच्या निर्णयासोबतच आपच्या राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात स्थानिक समित्या आहेत. भाजप वगळता पाठिंब्याबत निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाने या समित्यांना दिलेले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यावेळी अकोला आणि सोलापूर अशा २ मतदारसंघातून उभे आहेत. सोलापुरात आंबेडकरांना एमआयएम, माकप यासह समस्त आंबेडकरी विचारधारेच्या मंडळींनी पाठिंबा दिलेला आहे. आप यावेळी राज्यात एकही जागा लढवत नाही. आप व बहुजन वंचित आघाडी या दोघांचाही भाजप हा समान शत्रू आहे. त्यामुळे आप किमान सोलापुरात आंबेडकरांना पाठिंबा देईल, असे सर्वांचे गृहीतक होते. मात्र दोघांतील विसंवादामुळे ते गृहीतक फेल ठरले आहे.