हैदराबाद - शिक्षणाला वयाचं बंधन नसतं. हा विचार जगवणाऱ्या व्यक्तीशी राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या निमित्ताने ईटीव्ही भारतने संवाद साधला. या व्यक्तीचं नाव आहे योगेंद्र बांगर. बांगर यांनी आजीबाईंची शाळा हा उपक्रम सुरू केला आणि उपक्रमाच्या माध्यमातून अनेक वयोवृद्ध महिलांना शिक्षित केलं. त्यांचा हा प्रवास कसा सुरू झाला, या मागची प्रेरणा नेमकी काय होती, 30 आजीबाईंची काळजी कशी घेतली जातेय, या सर्व प्रश्नांवर त्यांनी ईटीव्ही भारतसोबत दिलखुलास संवाद साधला. वाचा, त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची कथा...
- प्रश्न - आजीबाईंची शाळा हा उपकम सुरू करण्याची प्रेरणा कशी मिळाली ?
उत्तर -आमच्या फांगणे हे गाव वसलेले आहे. मी तेथे मी शिक्षक म्हणून रुजू झालो. गावाचा विकास व्हावा तसेच तेथे चांगल्या गोष्टी होण्यासाठी मी प्रयत्नशील होतो. याच माध्यमातून 19 फेब्रुवारी 2016ला शिवजयंतीच्या वेळेस संत तुकाराम गाथेचे पारायण होते. तसेच शिवचरित्राचे पठण करण्यासाठी गावातील शंभर महिला एकत्र आल्या होत्या. त्यात आजीबीईही सहभागी झाल्या होत्या. तेव्हा त्यांनी हे चरित्र लिहिता-वाचता आले असते, तर आम्हाला आनंद झाला असता. ही खंत त्यांनी व्यक्त केली. तेव्हा ही खंत नष्ट कशी करायची याचा विचार मी करायला लागलो. त्यावेळेस किरीट दलाल आणि ग्रामस्थ सर्वांनी एकत्र येत जागतिक महिला दिनाच्या वेळेस या आजीबाईंना लिहायला, वाचायला, सही करायला शिकवल्यास त्यांच्या आयुष्यात बदल होईल. या विचाराने आम्ही 8 मार्च 2016 रोजी आजीबाईंची शाळा हा उपक्रम सुरू केला. यावेळेस आम्ही गावातून आजींची वाजत गाजत ग्रामप्रदक्षिणा काढली.
- प्रश्न - आयुष्यभर अक्षरे न वाचणाऱ्या आजीबाईंना शाळेत आणणे कठीण गेले का?
उत्तर - सुरुवातीच्या काळापासून ग्रामस्थांनी सहकार्य केलं. कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. 70 कुटुंबांनी आनंदाने सहकार्य केले. या वयात शाळेत शिकण्यासाठी त्यांना जिज्ञासा होती. जिद्द होती. आत्मविश्वास होता. त्यांना गणवेश म्हणून गुलाबी रंगाचं लुगडं नेसवण्यात आलं होतं. पाठीवर दप्तर घेऊन काही आजीबाई काठीत टेकत टेकत का होईना पण आनंदात शाळेत आल्या.
- प्रश्न - या आजीबाईंना शिकवण्यासाठी तुम्ही तुमच्या शाळेत कोणकोणते नवीन उपक्रम राबविले?
उत्तर -आमच्या या कामात आमच्या गावातीलच शितल मोरे आणि त्यांचे पती प्रकाश मोरे यांनी आम्हाला खूप मदत केली. आजीबाईंना शिकवणं हे खूप मोठं आव्हान आहे. काही आजीबाईंची आरोग्याची स्थिती पण चांगली नव्हती. पण प्रेमाच्या, जबाबदारीच्या बळावर आम्ही हे आव्हान पेललं.
- प्रश्न - या आजीबाईंना कशाप्रकारे शिकवलं गेलं?