मुंबईAaditya Thackeray: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय. या संदर्भात आमदार आदित्य ठाकरे यांनी 'X' या सोशल मिडिया साईटवर ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, "तुम्ही पाहिलंच असेल, गेल्या आठवड्यात दोन महत्त्वाच्या भेटी झाल्या. त्या महत्त्वाच्या भेटी नव्हत्या, फक्त एक महत्त्वाची व्यक्ती टाईमपाससाठी विदेशात जाणार होती. आमचे बेकायदेशीर मुख्यमंत्री जर्मनी, लंडनला जाणार होते, पण मी ट्विट करून भेटीचं वेळापत्रक विचारलं. त्यानंतर हा दौरा 30 मिनिटातच रद्द करण्यात आलाय. मुख्यमंत्री फक्त सुट्टी घालवण्यासाठी विदेश दौऱ्यावर जात होते, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलाय. सुट्टीसाठी जायचं असेल तर स्वतःच्या पैशावर विदेश दौऱ्यावर जावं असा टोला देखील त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावलाय.
परदेश दौऱ्यातून काय साध्य होणार : राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यातच सरकारचे परदेश दौरे मोठ्या प्रमाणात वाढले, असून या दौऱ्यावरून विरोधक त्यांच्यावर सातत्यानं टीका करत आहेत. याप्रसंगी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, सरकारच्या परदेश दौऱ्यातून काय साध्य होणार आहे. जनतेच्या पैशावर सरकारचे विदेश दौरे सुरू असून जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे. वास्तविक हे घटनाबाह्य, संविधान विरोधी सरकार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परदेश दौऱ्यावर जाऊन काय करणार होते? याबाबत मी ट्विट केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा परदेश दौरा रद्द केला, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
देशात लोकशाही आहे का : दुसरीकडं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचा साऊथ आफ्रिकेतील घाणा येथील दौराही रद्द केला आहे. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्रात लोकशाही मारत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतरही आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यास विलंब करत आहेत. वास्तविक सर्वोच्च न्यायालयानं मे महिन्यात निकाल दिल्यानंतर त्यांनी 4 महिने होऊनही निकाल लांबणीवर ठेवला. अजूनही हा निकाल कधी लागेल याबाबत स्पष्टता नाही. देशात लोकशाही आहे की नाही? असा सवाल देखील ठाकरे यांनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या परदेश दौऱ्याला काही महत्त्व नव्हते. त्याला कुठल्याही पद्धतीचा अजेंडा नसल्यानं हे दौरे त्यांना रद्द करावे लागले, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.