नागपूर - 'सत्तेसाठी कशी हाव केली जाते, हे मागील काही दिवसात पाहायला मिळाले. चिखलात कमळ फुलते, मात्र चिखल करा आणि कमळ फुलवा, असे आता चालणार नाही,' असा इशारा आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभेच्या अभिभाषणात बोलताना अप्रत्यक्षरित्या भाजपला दिला.
हेही वाचा-नागरिकत्व विधेयकावरुन विधानसभेत पुन्हा गदारोळ; सुधीर मुनगंटीवार आक्रमक
सत्तेची हाव कशी असते आणि मित्रांना कसे डावलले जाते, हे मी पाहिले आहे. आमचे आवाज वेगवेगळे असले तरीही आमच्या सरकारमध्ये एकमत आहे, एवढे नक्की. यापुढे कुठेही चिखल करून कमळ फुलवा, असले प्रकार होऊ देणार नाही. लोकशाही काय असते, हे महाविकासआघाडीने दाखवून दिले आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आम्ही वचन दिले आहे. मात्र, पर्यावरण बदलत चालले आहे. त्याचा परिणाम शेतीवर होत आहे. त्यामुळे पर्यावरण जोपासण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. नोटाबंदी व जीएसटीमुळे अनेक उद्योगांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. पहिलीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण बदलण्याची गरज आहे. डोनेशनशिवाय शिक्षण मिळवणे कठीण झाले आहे. मात्र, तसे शिक्षण घेऊन पण नोकरी मिळणे अवघड झाले आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.