मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आजपासून सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणातून राज्य सरकारने केलेल्या विकास कामांचा आढावा आणि भविष्यात सरकारकडून केल्या जाणाऱ्या विकास कामाचा उल्लेख अभिभाषणात करण्यात आला होता. मात्र, राज्य सरकारने नवे राज्यपाल रमेश बैस यांची दिशाभूल केली आहे. राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणात महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामाचा समावेश करण्यात आला असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी विधान भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर आरोप केले.
मुख्यमंत्र्यावर केली टीका:राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना आपल्याला अटक करण्याचा कट रचला जात होता, असा आरोप केला होता. या आरोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दुजोरा देत, हा कट रचला जात असताना आपणही तिथेच होतो. आपल्यासमोरच हा कट रचला गेला असल्याचा उल्लेख केला गेला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हे वक्तव्य म्हणजे गद्दारी करण्यासाठी देण्यात आलेल्या कारणांपैकी १२ वे कारण आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
गद्दारीसाठी नवे कारण:शिवसेनेची गद्दारी करण्यासाठी आतापर्यंत 40 आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वेगवेगळी वक्तव्य करण्यात आली आहेत. आता देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा कट महाविकास आघाडी सरकार करत असल्याचा नवीन आरोप करण्यात येत आहे. आता हे नवीन १२ वे कारण गद्दारी करण्यासाठी एकनाथ शिंदे देत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.