मुंबई Aaditya Thackeray: बुधवारी राज्य सरकारनं बेस्ट आणि बीएमसीमधील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस (Diwali Bonus) देण्याची घोषणा केली. याबाबत रात्री उशिरा पालिका कर्मचारी व राज्य सरकार यांच्यात बैठक पार पडली. यानंतर आज ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत, राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. माझ्या एका ट्विटनं राज्य सरकारला बैठक घ्यावी लागली आणि सरकारला पालिका व बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा लागला. घटनाबाह्य मुख्यमंत्री बोलले होते की, आम्ही काँक्रीटचे रस्ते करु, मुंबईकरांना खड्डेमुक्त करु, या कामाची घाईघाईने ऑर्डर काढण्यात आली. पण अद्याप कामाला सुरुवात झाली नाही. हे सरकार फक्त बोलत आहे, पण करत काही नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर (Aaditya Thackeray on State Government) केली.
1680 कोटी रुपयांच्या कामांचे कंत्राट रद्द : मुंबईतील ३१ मेपर्यंत ५० देखील रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाहीत. रस्त्याबाबतच्या घोटाळ्याबाबत मी राज्यापालांना भेटलो. माझ्या एका ट्विटनं दक्षिण मुंबईतील रस्त्याचे 1680 कोटी रुपयांच्या कामांचे कंत्राट पालिका आयुक्तांनी रद्द केले. पालिका आयुक्तांनी तशी सही केली आहे. या रस्ते घोटाळ्यात चार कंत्राटदार दोषी आढळलेत, त्यांना काळ्या यादीत टाकलं जावं, अशी आमची मागणी आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
...पण कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जातील का : पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, काम न होण्याची जबाबदारी कोणाची, 'आज कुछ तुफानी करते है...' असं म्हणत काम करण्याची आश्वासने देतात, पण कामं कुठेही सुरू झाली नाहीत. मुंबईत साधारण १ ऑक्टोबर ते ३१ मेपर्यंत रस्त्यांची कामं करण्याचा कालावधी आहे. अनेक आश्वासनं या सरकारने दिली आहेत, आमच्या भूमिकेमुळं बेस्ट आणि पालिका कर्माचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा झाली आहे. पण मुख्य प्रश्न हाच आहे की, त्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जाणार का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.