मुंबई:हिंदू धर्मातील प्रत्येक सणांचे असे एक वैशिष्ट्य आहे. हिंदू धर्मातील महत्वाचा आणि प्राचीन काळापासून साजरा केला जाणाऱ्या सणांपैकी एक सण म्हणजे होळी. होळी पौर्णिमेनिमित्त आज राज्यभरात होळीचे दहन केले जात आहे. अनिष्ट परंपरा, रुढी, भ्रष्टाचार आणि महागाईचे दहन या होळीच्या माध्यमातून करण्याची दरवर्षीची परंपरा आहे. मात्र मुंबईतील सर्वात जुन्या असलेल्या वरळी कोळीवाड्यात होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी होळीचे दहन मोठ्या उत्साहात आणि परंपरागत पद्धतीने करण्यात येते.
होळीनिमित्त भव्य देखावे: वरळी कोळी वाड्यात कोळी निमित्त भव्य देखावे उभारण्याची वर्षानुवर्षाची परंपरा आहे. यंदाही वरळी येथील कोळीवाड्यात कोळी बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य देखाव्याची निर्मिती केली होती. हत्तीवर अंबारीत बसलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य प्रतिकृती तयार करण्यात आली होती. तर सभोवती गडकिल्ल्यांची प्रतिकृती उभारण्यात आली होती. तर परिसराला पूर्णतः विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच होळी दहनापूर्वी वरळी कोळी वाड्यात पालखी काढण्याची आणि कलशांची मिरवणूक काढण्याची पद्धत आहे. यावेळी कोळी भगिनी सजवलेल्या मातीच्या एकावर एक तीन किंवा त्यापेक्षा अधिक ठेवलेल्या कलशांची मिरवणूक काढतात. यावेळी पारंपारिक कोळी गीतांवर कोळी महिला भगिनींकडून नृत्यही सादर केले जाते. हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होते.