मुंबई : शिवसेना सचिव, शिवसेना चित्रपट अध्यक्ष व अभिनेते आदेश चंद्रकांत बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा आज(शुक्रवार) नियुक्ती करण्यात आली आहे.
आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती - न्यास अध्यक्षपदी आदेश बांदेकर बातमी
शिवसेना नेते आदेश बांदेकर यांची प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवार 24 जुलै 2020 पासून पुढील तीन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेले अभिनेते आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शुक्रवार 24 जुलै 2020 पासून पुढील तीन वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली, असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. आदेश बांदेकर यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. 2018 साली शिवसेना भाजप युती सरकारच्या कालावधीत श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
टीव्हीवरील कार्यक्रमांमधून लोकप्रिय झालेले अभिनेते आदेश बांदेकर महाराष्ट्राचे भावोजी म्हणून प्रसिद्ध आहेत. होम मिनिस्टर या कार्यक्रमापासून अभिनेते, सूत्रसंचालक अशा विविध भूमिका वठवलेल्या बांदेकर यांनी 2009 साली शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी माहिममधून शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, मनसेचे नितीन सरदेसाई यांनी त्यांचा पराभव केला. पुढे 2012 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी पक्षासाठी चांगली कामगिरी बजावली. त्यानंतर त्यांची शिवसेनेच्या सचिवपदी नेमणूक करण्यात आली.