मुंबई : कोरोनाच्या दहशतीमुळे कोणीही कोणाच्या मदतीला धावून येत नाही. असाच अनुभव मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याबाबत घडला आहे. या कर्मचाऱ्याची प्रकृती बिघडली तर कोरोनाच्या भीतीने त्याला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दरम्यान रुग्णवाहिका येणे, रुग्णालयापर्यंतचे अंतर आणि कोरोनाच्या दहशतीमुळे या कर्मचाऱ्याला कोणी हात लावला नाही. त्याला वेळेवर उपचार मिळाले नाही त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या कर्मचाऱ्याचा मृत्यू केवळ निष्काळजीपणामुळे गेल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.
मुंबई महापालिकेत महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती व इतर समिती अध्यक्षांची तसेच पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांची कार्यालये आहेत. महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती व इतर समिती अध्यक्षांच्या कार्यालयात पालिकेच्या चिटणीस विभागाकडून कर्मचारी नियुक्त केले जातात. अजित दुखंडे याची क्लर्क पदावर विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या कार्यलयात नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, बुधवारी त्याची प्रकृती अचानक बिघडली. परंतु कोरोनाची दहशत असल्याने त्याला कोणी हातही लावला नाही. त्यात पालिका मुख्यालयाखाली रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यामुळे या क्लर्कला रुग्णालयात घेऊन जाण्यास उशीर झाला.