मुंबई: बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील प्रतीक्षा बंगल्याच्या बाजूला असलेल्या सिग्नल जवळ ऑटो रिक्षाने प्रवास करीत असलेल्या एका महिलेचा अज्ञात व्यक्तीने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी जुहू पोलीसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध घेऊन त्याला 24 तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. अटक आरोपीचे नाव अरविंद वाघेला वय वर्ष 47 असे आहे. तो फेरीवाला असून विलेपार्ले पश्चिम येथील एका चाळीत राहतो.
जुहू पोलीस ठाण्याच्या परीसरात ही विनयभंगाची घटना घडली. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून जुहू पोलीस ठाण्यात या प्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली आणि कोणताही पुरावा उपलब्द नसताना ही आरोपीला 24 तासांच्या आत म्हणजेच गुन्हा दाखल झाल्या नंतर दुसऱ्या दिवशी दुपारी एकच्या सुमारास अटक केली.
जुहू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या ऑटोरिक्षाने प्रवास करीत होत्या. त्यांची रिक्षा बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील प्रतीक्षा बंगल्याच्या बाजूला असलेल्या सिग्नल जवळ आली असता असताना ऑटो मध्ये एका अनोळखी इसमाने त्यांचा विनयभंग केला. या संबंधाची तक्रार त्यांनी केली. त्या नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. हा गुन्हा घडला ती वेळ रात्रीची असल्याने तसेच गुन्हयामधील तक्रारदार या आरोपीतास ओळखत नसल्याने तसेच आरोपी बाबत काहीही माहिती नसल्याने या आरोपीताचा शोध घेणे थोडे कठीण काम होते.