मुंबई -मुंबईवर पुन्हा एकदा अतिरेकी हल्ला करण्याची धमकी ट्विटर हॅण्डलचा वापर करुन देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा अतिरेकी हल्ला करण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे महत्वाच्या ठीकाणी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
दहशतवादी हल्ल्यासंदर्भात मेल : शुक्रवारी 03 फेब्रुवारी रोजी एनआयएच्या ईमेल आयडीवर दहशतवादी हल्ल्यासंदर्भात एक मेल आला होता. या मेलनंतर महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. याप्रकरणी आता आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. ईमेल आयडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोबाईल क्रमांकापूर्वीही अनेक मेल आयडी तयार करण्यात आले असून रशियाहून गोव्याला येणाऱ्या फ्लाइटमध्येही यापैकी एका मेल आयडीवरून बॉम्ब असल्याचा दावा करण्यात आला होता.
ईमेलचा पाकिस्तानशी संबंध :ईमेलकर्त्याने स्वतःची ओळख तालिबानी असल्याचा दावा केला आहे. तालिबान संघटनेचा नेता सिराजुद्दीन हक्कानीच्या आदेशानुसार दहशदवादी हल्ला करण्यात येणार असल्याचे ईमेलमध्ये म्हटले आहे. यानंतर मुंबई पोलिसांसह इतर यंत्रणानी तपास करण्यास सुरवात केली आहे. या ईमेलचा पाकिस्तानशी संबंध असल्याचेही प्राथमिक तपासात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपीने Jhonwickincia@gmail.com या ईमेल आयडीवर धमकीचा मेल काल पाठवला होता. हा मेल आयडी तयार करण्यासाठी वापरण्यात आलेला क्रमांक पाकिस्तानमधील कराची येथून ऑपरेट करण्यात अल्याचे तपासत समोर आले आहे.
विमानात बॉम्ब : यासोबतच या मोबाईल क्रमांकावरून अनेक ईमेल आयडी तयार करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. यापैकी एक गोव्यातील दाबोलीम विमानतळाला धमकी देण्यासाठीही वापरण्यात आला होता. सुत्रांच्या माहितीनुसार ईमेलमध्ये रशियाहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचे ईमेलमध्ये लिहिले होते. त्यानंतर विमानाला उझबेकिस्तानला वळवण्यात आले होते.