मुंबई CM Eknath Shinde : देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन (Corona JN1) हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडिट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलीय.
बैठक पार पडली : मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन माध्यमातून ही बैठक घेतली. त्यामध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
स्थितीबाबतची घेतली माहिती : ऑक्सिजन प्लांट्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पाईपलाईन्स, आरटीपीसीआर लॅब, डयुरा/लिक्विड ऑक्सिजन प्लांट या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी. योग्य पद्धतीने ते कार्यान्वित आहेत की नाही याची खात्री करतानाच लसीकरणाचा आढावा घ्यावा. ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांची माहिती घ्यावी. लसीकरण करण्याच्या दृष्टीने तयारी ठेवावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. लस आणि औषध साठा पुरेसा उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यावी. आरोग्य यंत्रणेने टास्क फोर्सची स्थापना करुन त्यातील तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी कोविड सेंटर, विलगीकरण बेड्स, आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर बेड्सच्या स्थितीबाबतचीही माहिती यावेळी घेतली.
लक्षणे दिसल्यास तपासणी करावी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाने याआधी देखील कोविडच्या संकटाचा यशस्वी मुकाबला केला आहे. संपूर्ण जगाने त्याबाबतीत आपल्या देशाचे अनुकरण केले. मागील अनुभवाच्या आधारे आताही राज्यातील यंत्रणा संपूर्णपणे सज्ज आहे. त्यामुळं घाबरण्याचं कारण नाही. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास त्यांनी तत्काळ तपासणी करुन घ्यावी. आगामी सण आणि नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क् वापरावा. आपल्यामुळं इतरांना संसर्ग होणार नाही यासाठी काळजी घेण्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी नागरिकांना सांगितलं.