मुंबई - दादर येथील महापालिकेच्या क्रांतिसिंह नाना पाटील मंडईतील परवानाधारक गाळेधारकांकडून जास्त भाडे घेण्यात आले होते. हे भाडे कमी करण्यासाठी सातत्याने मागणी केली जात होती. त्यानंतर आता पालिकेने या भाडेदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेकडो गाळेधारकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, आचारसंहिता लागू असल्याने ती शिथिल होईपर्यंत या गाळेधारकांना वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - येत्या 12 आठवड्यात माहुलमधील 5500 कुटुंबीयांचे स्थलांतर करा - उच्च न्यायालय
क्रांतिसिंह नाना पाटील मंडईत २११ परवानेधारक व्यवसाय करतात. १९९६ ते २००२ पर्यंत प्रतिदिन २८ रुपये दराने भाडे आणि व्याज आकारला जात होता. तर आता बाहेरून आलेल्या गाळेधारकांना तळमजल्यावर प्रतिचौरस फूट १० हजार ९२५ रुपये आणि काही गाळेधारकांना ६५०० रुपये दराने गाळे दिले. मात्र, परवानाधारक २११ गाळेधारकांना पालिकेने १६ हजार ४०० रुपये प्रतिचौरस दराने गाळे दिले. परंतु, हे दर गाळेधारकांना परवडणारे नाहीत. त्यामुळे १६ हजार ४०० ऐवजी १०९२५ रुपये इतकी कपात करण्यात यावी, अशी सूचना नगरसेवकांनी केली होती. यावर महापालिका आयुक्तांनी अभिप्राय देताना, दादर पश्चिमेकडील रहदारीची कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यांवरील आणि पदपथांवरील पात्र फेरीवाल्यांना हॉकर्स प्लाझा इमारतीत समाविष्ट केले.