मुंबई - मंत्रसिद्धीने मुलाचाकर्करोगबरा करतो असे सांगत एका मांत्रिकाने महिलेवरबलात्कारकेल्याची घटना उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे, तर पीडित महिलेच्या पतीकडून साडेतीन लाख रुपयेही उकळले. महिलेच्या कर्करोड पीडित १० वर्षीय मुलाचा २०१८ मध्ये मृत्यू झाला. विशेष म्हणजे हे दाम्पत्य उच्चशिक्षित असून महिलेचा पती शास्त्रज्ञ आहे. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
चेंबूर येथे राहणाऱ्या पीडित दाम्पत्याच्या एकुलत्या एका मुलाला कर्करोग झाल्याचे निदान वर्ष २०१७ मध्ये झाले. त्यानंतर दोघांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. मुलाच्या तब्येतीत फरक पडत नसल्याचे पाहून मुलाच्या आईने एका मंदिरात मांत्रिकाची भेट घेतली. काही विशिष्ट कर्मकांडांद्वारे मुलाचा कर्करोग बरा होऊ शकतो, असे आश्वासन मांत्रिकाने पीडित महिलेला दिले.
ट्रॉम्बे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा उज्जैनचा असलेल्या या मांत्रिकाने पीडित महिलेच्या घरी यज्ञ केला. यज्ञ सुरू असताना त्याने कर्करोग पीडित मुलगा आणि महिलेला पवित्र राख प्राशन करण्यास सांगितले. राखेत अगोदरच गुंगीचे पदार्थ मिसळून आणले होते. राख खाल्ल्यानंतर दोघेही बेशुद्ध झाले. काही वेळाने दोघेही शुद्धीवर आले. मांत्रिक घरातच होता. मुलाचा आजार बरा व्हावा यासाठी असे केले असून लवकरच मुलगा आजारातून बरा होईल, असे मांत्रिकाने त्यांना सांगितले. त्यानंतर त्याने पीडित महिलेकडून ६० हजार रुपये किमतीचे दागिने घेतले आणि निघून गेला.
काही दिवसांनंतर मांत्रिकाने महिलेशी पुन्हा संपर्क साधत मुलात आणखी काही विचित्र दोष निर्माण झाल्याचे सांगितले. मात्र ते आपण दूर करु शकतो असे तो म्हणाला. त्यानंतर मांत्रिकाने महिलेला त्याच्या अंधेरी येथील घरी बोलावले. पीडित महिला मांत्रिकाच्या घरी गेली. तिथे त्याने महिलेवर बलात्कार केला. हा कर्मकांडाचा एक भाग असल्याचे त्याने महिलेला सांगितले. बलात्कार करत असताना मांत्रिकाने या कृत्याचे व्हिडिओ शूटिंगही केले. शिवाय फोटोही काढले. त्यानंतर तो व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत होता .
सततचा त्रास सहन न झाल्याने शेवटी महिलेने घडलेला सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला आणि दोघांनी मांत्रिकाविरोधात ट्रॉम्बे पोलिसात तक्रार नोंदवली. पीडित दाम्पत्याच्या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलिसांनी कलम 376 (बलात्कार करणे) ३५४ अ, (लैंगिक शोषण) ३८४ (खंडणी गोळा करणे) आणि ५०६ (धमकावणे) आणि जादुटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ट्रॉम्बे पोलीसांतर्फे पुढील तपास सुरू आहे.