मुंबई -गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर, परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील वकील जयश्री पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) किंवा इतर कोणत्याही स्वतंत्र एजन्सीमार्फत चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
गृहमंत्र्यांवर आरोप झाल्याने तसेच ते आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याचे संशय असल्याने अनिल देशमुख यानी मंत्रीपदी राहण्या योग्य नसल्याचेही पाटील म्हणाल्या. याचिकार्त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, परमबिर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवून या प्रकरणाची दखल घेतली नाही. परमबीर सिंग हे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत आणि फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 154 नुसार अधिकार असूनही त्यांनी गुन्हा नोंदविला नाही. त्यांचाही तपास व्हावा, अशी मागणी केली आहे. तसेच कथित गुन्हेगारी कट रचले गेलेल्या ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित करण्यासाठी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडून तपास अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची न्यायालयात विनंती केली आहे.