मुंबई- वसुली एजंटच्या जाचाला कंटाळून शहरातील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमोल वैती असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. अमोलने विविध बँकेतून कर्ज घेतले होते. मात्र व्यवसायात नुकसान झाल्याने तो वेळेत कर्ज फेडू शकला नाही.
अमोल फ्रान्सिस वैती हा दहिसर परिसरातील खंदारपाडा येथे राहत होता. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या मित्रांना, नातेवाईकांना व्हाट्सअॅपच्या माध्यमातून सुसाईड नोट लिहून पाठवली होती. त्यानंतर त्याने राहत्या घरी आत्महत्या केली. गेल्या काही महिन्यांपासून विविध बँकांकडून, वसुली एजन्सींकडून कर्ज वसुलीसाठी अमोल यास फोन येत होते. अमोलचे त्याच्या व्यवसायामध्ये फार मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे तो गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडला होता.