मुंबई -खारमधील 14-रोडवरील भगवती हाइट्स या इमारतीमध्ये एका मुलीचा तिच्या मित्रांनी खून केला. ३१ डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली. नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये जान्हवी कुकरेजा या 19 वर्षीय मुलीचा खून झाला.
जान्हवी कुकरेजा या मुलीचा तिच्या मित्रांनी खून केला वडिलांचा वाढदिवस साजराकरून गेली होती जान्हवी पार्टीला -
इमारतीच्या टेरेसवर झालेल्या पार्टी मध्ये एकूण १२जण उपस्थित होते. त्यामध्ये पाच मुलींचा समावेश होता. हे सर्वजण मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. मृत जान्हवी तिचा मित्र श्री जोगधनकर (वय 22) आणि दिया पडनकर (वय 19) यांच्यासोबत या पार्टीमध्ये सहभागी झाली होती. अगोदर पार्टीमध्ये येऊन हे तीघे पुन्हा जान्हवीच्या घरी तिच्या वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. सांताक्रुजमधील घरी वाढदिवस साजरा करून ते रात्री १२वाजता खारमधील पार्टीत पोहचले. मात्र, जान्हवीला पार्टीमध्ये आक्षेपार्ह गोष्टी आढळल्यानंतर तिने पार्टीमध्ये थांबण्यास नकार दिला.
तिघांमध्ये झाला होता जोरदार वाद -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जान्हवीने श्री आणि दियाला पार्टीमध्ये अश्लील चाळे करताना पाहिले. त्यानंतर तिघांमध्ये जोरदार वाद झाला होता. या वादा दरम्यान श्री आणि दियाने जान्हवीचे डोके जिन्याच्या लोखंडी रेलींगला आपटले. या झटापटीमध्ये जान्हवीच्या डोक्याला जबर मार लागला. त्यानंतर दोघांनी तिला तिथेच सोडून पळ काढला. मात्र, यश नावाच्या मित्राने जान्हवीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहिले. त्याने आपल्या कुटुंबाच्या मदतीने खार पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. या प्रकरणाचा तपासकरून पोलिसांनी श्री आणि दिया या दोघांना अटक केली आहे.