मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीत शासनाकडून टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली जात आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न शासनाकडून होत आहे. मात्र, अनेक ठिकाणी कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वांचे योग्यरित्या पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषत: मास्कचा वापर योग्य प्रकारे केला जात नाही. यामुळे सार्वजनिक स्थळे, प्रवास यासह खासगी वाहनांमध्येही प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक असल्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने दिले आहेत. या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 1 हजार रुपये दंड वसूल करण्यासह भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्याचाही इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी (दि. 29 जून) एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकानुसार, सार्वजनिक जीवनात वावरताना मास्क लावणे हे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. कोणत्याही कारणासाठी रस्ते, कार्यालये, दुकाने, बाजार, दवाखाने, रुग्णालये यासारख्या सार्वजनिक स्थळी वावरताना प्रत्येक नागरिकाने मास्क लावणे बंधनकारक आहे. कार्यालयीन वापराच्या किंवा खासगी वाहनातून प्रवास करतानाही प्रत्येकाने मास्क लावणे आवश्यकच आहे. सार्वजनिक वाहतूक साधनांमधून प्रवास करतानाही मास्क लावणे गरजेचे आहे. कोणत्याही बैठकीला किंवा सामुहिक कार्यक्रमाला येताना तसेच कार्यस्थळी मास्क लावल्याशिवाय उपस्थित राहणे हे नियमांच्या विरुद्ध मानले जाईल. प्रमाणित (स्टँडर्ड) मास्क, तीन स्तरांचे (थ्री प्लाय) मास्क किंवा औषध दुकानदारांकडे उपलब्ध असलेले साध्या कापडाचे मास्क यासह घरगुती तयार केलेले, निर्जंतुकीकरण करून वारंवार वापरात येणारे मास्क यांचाही उपयोग नागरिक करू शकतात, असे परिपत्रकात म्हटले आहे.