मुंबई -महाराष्ट्रात स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर खासगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याबाबत आज (दि. 13 जाने.) मंत्रिमंडळात निर्णय झाला आहे. तसेच कार्यपध्दतीसाठी मार्गदर्शक सूचना व मॉडेल विधेयकास मान्यताही मिळाली आहे.
आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाचे नवीन महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्ताव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व शासनास सादर करण्यासाठी सुधारणा करण्याचा निर्णय आज (बुधवार) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्याप्रमाणे सुधारणा करून अध्यादेश काढण्यात येणार आहे.
कोरोनामुळे बहुतांशी सामाजिक व आर्थिक व्यवहार, घडामोडी मंदावल्याने, थांबलेल्या असल्याने, विविध संस्थांच्या महाविद्यालय इमारत तसेच रुग्णालयाचे बांधकाम, त्यांच्या परवानग्या, नोंदणी तसेच कागदपत्र तयार करण्यास बऱ्याच अडचणी येऊन, निकषांची पुर्तता करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळाला नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या अधिसुचनेमधील अंतिम मुदतीपर्यंत (31 ऑक्टोबर, 2020 पर्यंत) परीपूर्ण प्रस्ताव सादर करणे शक्य झाले नाही.
त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, 1998 मधील या कलमांमध्ये आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाचे नवीन महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्ताव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व शासनास सादर करण्यासाठी सुधारणा करण्याचा विचार सुरु होता. त्यानुषंगाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, 1998 मध्ये अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.