महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मृत्यूनंतरही 'त्याने' दिले ५ जणांना जीवदान

रायगडमधील माणगाव येथील २५ वर्षीय तरुणाचा अपघातामध्ये ब्रेन डेड झाला. त्यामुळे जे. जे. रुग्णालयाच्या वतीने लगेच त्याच्या प्रत्यारोपणासाठी त्याच्या कुटुंबाला समुपदेशन करण्यात आले. कुटुंबाची परवानगी मिळताच त्याचे मूत्रपिंड, यकृत आणि हृदय काढून इतर पाच रुग्णांना जीवदान देण्यात आले.

j j hospital mumbai
मृत्यूनंतरही 'त्याने' दिले ५ जणांना जीवदान

By

Published : Feb 11, 2020, 8:56 AM IST

मुंबई -अवयवदान हे श्रेष्ठदान असून त्याच्या प्रत्यय एका घटनेवरून आला आहे. मृत्यूनंतरही महेश येरुणकर या 25 वर्षीय तरुणाने पाच जणांना अवयवदानाच्या माध्यमातून जीवनदान दिले आहे. त्याच्या घरच्यांनी अवयवदानाला दिलेल्या परवानगीमुळे 5 जणांचे जीव वाचले आहेत. त्याच्या कुटुंबाने घेतलेला निर्णय सर्वांना आदर्श घेण्यासारखा आहे, असे मत त्याचे अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

मृत्यूनंतरही 'त्याने' दिले ५ जणांना जीवदान

रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे राहणारा महेश आपल्या आजोबाच्या पुण्यतिथीनिमित्त 6 फेब्रुवारीला शेजारच्या गावात गेला होता. मात्र, परत घरी येताना रात्री १ वाजण्याच्या सुमारास त्याच्या दुचाकीला अपघात झाला आणि महेशच्या छाती, पोट व मेंदूला जखम होऊन त्याच्या दोन्ही कानातून रक्तस्त्राव होऊ लागला. उपचारासाठी त्याला माणगाव येथील डॉक्टरकडे नेण्यात आले. त्याची स्थिती नाजूक असल्याने तेथील डॉक्टरांनी महेशला तत्काळ जे.जे. रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. पुढील उपचारासाठी महेशला जे. जे. रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल केले. त्यावेळेस महेश हा पूर्णतः बेशुद्ध अवस्थेत होता. त्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.

सर्जरीचे तज्ज्ञ डॉ. गिरीश बक्षी यांना तत्काळ बोलाविण्यात आले. डॉ. बक्षी यांनी महेशची तपासणी केली असता त्याची प्रकृती ही अत्यंत नाजूक असल्याचे सांगितले. ८ फेब्रुवारीला दोन वेळेस त्याच्यावर श्वासोश्वास चाचणी करण्यात आली. सकाळी ७:३० वाजता महेशला मेंदू मृत (ब्रेन डेड) म्हणून घोषित करण्यात आले. रुग्णालयाच्या वतीने लगेचच त्याच्या अवयव प्रत्यारोपणासाठी त्याच्या कुटुंबाला समुपदेशन करण्यात आले. आपला तरुण मुलगा गमावलेला असतानाही महेशच्या वडिलांनी प्रत्यारोपणास परवानगी दिली. त्यानंतर जे.जे. रुग्णालयाने अगदी युद्धपातळीवर महेशचे अवयव प्रत्यारोपण प्रक्रिया सुरू केली.

अवयव प्रत्यारोपणासाठी महाराष्ट्राच्या प्रत्यारोपण समितीशी संपर्क साधला. युरॉलॉजी विभागाच्या डॉ. वेंकट गीते यांनी महेशच्या एका मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण जे. जे. रुग्णालयातील एका रुग्णावर केले. तसेच दुसरे मूत्रपिंड उमराव वोक्हार्ट रुग्णालय येथे पाठविण्यात आली, तर हृदय हे जसलोक या रुग्णालयातील एका रुग्णास देण्यात आले; यकृताचा काही भाग अपोलो, तर काही भाग ज्युपिटर हॉस्पिटल येथे प्रत्यारोपित करण्यात आला. सव्वा चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर महेशचे पाच अवयव हे वेगवेगळ्या रुग्णालयातील गरजू रुग्णांना प्रत्यारोपणासाठी पाठविण्यात आले. रविवारी महेशचा मृतदेह हा त्याच्या परिवाराकडे सुपूर्द करण्यात आला. त्यावेळेस जे. जे. रुग्णालयातील सर्व डॉक्टर, कर्मचारी व उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते व साश्रू नयनांनी सर्वानी महेशला व त्याच्या परिवाराला मानवंदना दिली.

समाजात आज अवयवदानाची जी चळवळ निरनिराळ्या स्तरावर रुजू पाहत आहे त्या सर्वांसाठी महेश व त्याच्या परिवाराने एक आदर्श घालून दिला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच या संपूर्ण घटनेच्यावेळी रुग्णालयातील सर्व डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका सर्वांचे आभार मानले व डॉ. संजय सुरासे यांचे अभिनंदन केले. प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. माथूर यांनी देखील जे. जे. रुग्णालयाचे कौतुक केले. अश्या घटना समाजात एक दीपस्तंभाचे काम करतात, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details