मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारे टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेनेने हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभेत आणला होता. यावर आज अधिकारी व शिवसेना नेत्यांची विधानभवनात बैठक बोलावण्यात आली आहे. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर बाळासाहेबांचा एक व्हिडिओ टाकत शिवसेनेला टोला लगावला आहे.
रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीविरुद्ध ७ सप्टेंबर, २०२० रोजी हक्कभंग प्रस्ताव उपस्थित करण्यात आला होता. याप्रकरणी विधानसभा विशेषाधिकार समितीसमवेत प्राथमिक विचारविनिमय करण्याबाबत आज विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे आमदार, नेते उपस्थित राहणार आहेत. बैठकीत अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री व आदी नेत्यांवर केलेल्या हक्कभंग वक्तव्यावर काय निर्णय घ्यायचा यावर चर्चा होणार आहे. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडिओ ट्विटरवर टाकला आहे. तसेच, कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचण्यापूर्वी सत्ताधारी शिवसेनेचे आमदार शिवसेनाप्रमुखांचा हा व्हिडिओ नक्की पाहतील आणि निर्णय करतील, अशी मी अशा बाळगतो, असे म्हटले आहे.