मुंबई - चौथ्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान पार पडले. सर्वसामान्य मतदाराबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मतदानाचा अधिकार पार पाडला. यावेळी १९५२ ते २०१९ असे सलग १७ लोकसभेसाठी मतदान केलेल्या एच. एम. प्रभू यांनी ईटीव्हीशी विशेष संवाद साधला.
९९ वर्षीय आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क यावेळी बोलताना प्रभू म्हणाले, की १९५२ मध्ये पहिल्यांदा मतदान करताना देशप्रेमाची भावना होती. त्यावेळी उमेदवार लोककल्याणासाठी उभे राहिले. विशेष म्हणजे कोणालाही पैशाची हाव नव्हती. अलीकडे कोणत्याच उमेदवारांमध्ये लोककल्याणाची भावना दिसत नाही. जसे की प्रत्येक उमेदवार पैसे कमवण्यासाठीच उभा राहिला, असे वाटते.
पहिल्या मतदानासंदर्भात आपल्या आठवणी सांगताना प्रभू म्हणाले, की पहिले मतदान हे अविस्मरणीय होते. त्यावेळी मी चले जाव आंदोलनात सहभागी झालो होतो. ब्रिटिश सरकारने अश्रूधूर सोडले, अत्याचार केले. परंतु लोकांनी जुमानले नाही. देशप्रेमाची भावना उस्फुर्त होती. मी काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता होतो. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हायचो. जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सरोजिनी नायडू या सर्वांना प्रत्यक्ष भेटता आले. तसेच सुभाषचंद्र बोस यांची मुंबईतील सभा मी पाहिल्या आहेत.
आजपर्यंत मी कधीही मतदान चुकवले नाही. उद्या काय होईल याची शाश्वती नाही. आजही देशात गरीबी आहे. ते नष्ट झाले पाहिजे. लोकांच्या मूलभूत सुविधा पूर्ण झाल्या पाहिजेत. तसेच जगभरात देशाची मान उंच होण्यासाठी आणि प्रतिष्ठा वाढविण्यासाठी प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे, असे प्रभू यांनी यावेळी सांगितले.
सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा द्यायला हव्यात. ज्येष्ठ नागरिक मतदान केंद्रावर आल्यावर त्यांचे हाल होतात. ९९ वर्षीय मला दुसऱ्या मजल्यावर मतदान करायला जावे लागले. त्यामुळे मला आज त्रास झाला. वृद्ध हवेत की नकोत हे सरकारने सांगावे, अशी भावना एच. एम. प्रभू यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.