मुंबई -महाराष्ट्र शासनाने अनलॉकनंतर वाहतूक, प्रवास व्यवस्था, नाट्यगृहे, सिनेमागृह, बाजारपेठा सुरळीतपणे सुरू केलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर माध्यमिक शाळेतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे बंद असले तरी ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण सुरू आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच 23 नोव्हेंबर 2020पासून राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत ‘एसओपी’ तयार करण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून मुख्यमंत्री यांच्या अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर शाळा सुरू करण्यात येतील. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करूनच शाळा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासंदर्भात पालकांची परवानगी घेऊन आरोग्यविषयक उपाययोजना करूनच शाळेतील कामकाज करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.