मुंबई- गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार कोसळणार्या पावसामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाल्याने अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, नाशिक विभागाच्या १४१ मोठे, २५८ मध्यम आणि दोन हजार ८६८ लघू पाटबंधारे प्रकल्पात ३३ हजार ८०४.३३ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ८२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. काही ठिकाणी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गतवर्षी याच तारखेस हा साठा ९० टक्के इतका होता.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव काही जिल्ह्यात जाणवत आहे. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. औरंगाबादमधील जायकवाडी धरणाचे १० ते २७ क्रमांकाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले आहेत. परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. धरणाचे दहा पैकी सहा दरवाजे तीन मीटर व उर्वरित दरवाजे २ मीटरपर्यंत उघडल्याने एकूण १ लाख ३ हजार २६१ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात केला जात आहे. पाण्याच्या विसर्गामुळे कमी उंचीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. खान्देशची जीवनवाहिनी असलेल्या तापी नदीला पूर आला आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हतनूर, सुलवाडे, सारंगखेडा आणि प्रकाशा या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अशा सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले आहेत. नाशिक गंगापूर धरणातून १५ हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग होत आहे. परिणामी गोदाकाठावरील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. संबंधित जिल्ह्यातील नदीकाठच्या सर्वच गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. ज्या भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे, तेथे एनडीआरएफच्या पथकांकडून बचावकार्य देखील सुरू आहे. काही जिल्ह्यातील नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.