मुंबई -विद्यापीठे, महाविद्यालये आदींमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या तब्बल 82 टक्के विद्यार्थ्यांपुढे कोरोना आणि टाळेबंदीच्या फटक्यामुळे पुढील शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचणी उभ्या राहिल्याची भीती आयआयटी मुंबईकडून नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे.
देशातील विविध विद्यापीठे, उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था, आयआयटी आदी शिक्षण संस्थांमध्ये शिकत असलेल्या 82 टक्के विद्यार्थ्यांना आर्थिक आणि इतर अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची माहिती आयआयटीकडून गुगल फॉर्मच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात समोर आली आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या 79 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन असून ते ऑनलाइन पद्धतीने आपले शिक्षण घेत आहेत. 32 टक्के विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप तर केवळ 6 टक्के विद्यार्थ्यांकडे डेस्कटॉप असल्याचे यावेळी कळाले. महाविद्यालये आणि विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले नसल्यामुळे त्यांना प्रोजेक्ट तसेस लॅबमध्ये संशोधन करता येत नसल्याचेही समोर आले आहे.
उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठ्याप्रमाणात निधीची आवश्यकता असते. मात्र, कोरोनामुळे सर्व पालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे आपले शिक्षण पूर्ण करता येईल की नाही अशी भीती विद्यार्थ्यांना सतावत आहे. या सर्व परिस्थिती आढावा घेण्यासाठी आयआयटी मुंबईच्या पथकाकडून सर्वेक्षण करण्यात आले. आयआयटीतील बी.एन. जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हे सर्वेक्षण घेण्यात आले.
त्यानुसार गुगल फॉर्मच्या मदतीने राज्यातील उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्यात आली. या सर्वेक्षणमध्ये राज्यभरातील 38 हजार 108 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये 19 हजार 495 मुली तर 18 हजार 602 मुलांचा यामध्ये समावेश होता.