मुंबई - येथील आर्थर रोड कारागृहात 77 कैदी व 26 जेल कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर यात आणखीन भर पडत नवीन 81 कैद्यांना याची लागण झाल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे जेल प्रशासनाने कारागृहाताच या कैद्यांचे विलगिकरन करून उपचार करण्यास सुरुवात केली आहे.
दोन दिवसांपूर्वी 77 कोरोना बाधित रुग्णांना माहुल गाव येथील ट्रांजिस्ट कॅम्प परिसरातील इमारतीत ठेवून उपचार सुरू करण्यात आले असून आता नव्याने 81 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने कोरोनाबाधित कैद्यांचा आकडा 158 वर पोहोचला आहे. तर 26 जेल कर्मचारी मिळून तब्बल 184 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
आकडा अधिक वाढण्याची भीती
1926 साली ब्रिटिशांनी बांधलेल्या या 94 वर्षे जुन्या कारागृहाची कैदी ठेवण्याची क्षमता 1 हजार 74 एवढी आहे. मात्र, सध्या या कारागृहात दोन हजारहुन अधिक कैदी ठेण्यात आल्याने कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईतील आर्थर रोड कारागृहात घनकचरा व्यवस्थापनाची गाडी व भाजीपाला व दुधाची गाडी ही बाहेरून येत असल्यामुळे कोरोनाचा प्रसार झाला असावा, असा अंदाज लावला जात आहे.
राज्यात 60 छोटी मोठी कारागृह असून यात एकूण कारागृहात तब्बल 25 हजार कैदी ठेवण्याची क्षमता आहे. मात्र, बहुतांश कारागृहात मर्यादेपेक्षा अधिक कैदी ठेवले जात असल्याने मुंबई सारखी परिस्थिती इतर कारागृहात सुद्धा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा -भायखळा महिला कारागृहातही कोरोनाचा शिरकाव, एक महिला कैदी बाधित