मुंबई-कोरोनाचे रूग्ण बरे होण्याची संख्या दिवसागणीक वाढत आहे. राज्यात बरे झालेल्या एकूण रुग्णांच्या निम्मे रुग्ण या एका आठवड्यात बरे झाले आहेत. आतापर्यंत सर्वाधिक ६०० हून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या सुमारे ७ हजार ६८८ एवढी झाली आहे. विशेष म्हणजे बरे होणारे सर्वाधिक रुग्ण हे मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव या भागातील असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
केंद्र शासनाने एक आठवड्यापूर्वी कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत सुधारीत धोरण जाहीर केले होते. त्यानुसार कोणतेही लक्षणे नसलेल्या रुग्णांना १४ दिवसांऐवजी दहाव्या दिवशी घरी सोडण्यात येत आहे. यामुळे बरे झालेल्या रूग्णांची संख्या देखील वाढली आहे.
गेल्या रविवारी म्हणजे १० मे रोजी ३९९ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर ११ मे रोजी ५८७, १२ मे रोजी ३३९, १३ मे रोजी ४२२, १४ मे रोजी ५१२, १५ मे रोजी ५०५, १६ मे रोजी ५२४ आणि आज १७ मे रोजी ६०० हून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. अशा प्रकारे या एका आठवड्यामध्ये ३ हजार ७०० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत ७ हजार ६८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यातील ५० टक्के रूग्ण हे १० ते १७ मे या कालावधीतील आहेत.