मुंबई :आमदार सुनील राणे यांनी विधानसभा अधिवेशनात वडाळा येथील पाेर्ट ट्रस्टच्या रुग्णालयाचा विषय उपस्थित केला हाेता. सुसज्ज हॉस्पिटल तयार असतानाही त्याचा वापर हाेत नाही. ८० व्हेंटीलेटरसह अनेक मशीनरी धूळ खात पडले आहेत. वर्षभरापूर्वी सुसज्ज असलेल्या या हाॅस्पीटलमध्ये सध्या केवळ प्राथमिक दर्जाची आराेग्य सेवा दिली जात आहे. याबाबत माहिती घेतली असता केवळ एका अधिकाऱ्याच्या हेकेखाेरपणामुळे रुग्णांना सेवा मिळत नसल्याचे दिसून आले आहे. मुंबई पाेर्ट ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष राजीव जलाेटा हस्तांतरणास सातत्याने खोडा घालत असल्याचा आरोप केला जात आहे.
हॉस्पिटलचा कायापालट:मुंबई पाेर्ट ट्रस्ट येथील हाॅस्पीटलचा पीपीपी (बांधा, वापरा, हस्तांतरीत करा) या तत्वानुसार विकास करण्यासाठी ग्लाेबल टेंडर काढण्यात आले हाेते. अटी शर्थींमुळे व्यावसायिक रुग्णालय ते घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे, बारा वेळा रिटेंडर झाले. सामाजिक उत्तर दायित्वाच्या भावनेतून रुग्णसेवा करण्यासाठी अजिंक्य डीवाय. पाटील ग्रुपने टेंडर भरून हे हाॅस्पीटल चालविण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार ३ ऑक्टाेबर २०१९ राेजी करार झाला. मुंबई पाेर्ट ट्रस्ट, कर्मचारी संघटना यांनाही त्यात सामावून घेण्यात आले होते. अजिंक्य ग्रुपने या हाॅस्पीटलचा विकास सुरू केला. त्यानंतर काही दिवसांतच काेविडचा प्रकाेप सुरू झाला असता, व्हेटिलेटरपासून सर्व उच्च दर्जाच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. मात्र हस्तांतरण झाले नसल्याने हे रुग्णालय अद्याप सुरु झाले नाही, अशी माहिती अजिंक्य ग्रुपचे संचालक हृदयेश देशपांडे यांनी दिली.
हस्तांतरणात खोडा :२४० बेडच्या हाॅस्पीटलचे ६०० बेडमध्ये रुपांतर करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यास सुरूवात केली. तेथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसह नव्याने प्रशिक्षित डाॅक्टर, नर्ससह इतर मनुष्यबळाचीही तयारी केली. मात्र प्रत्यक्ष हस्तांतरणाला वारंवार खाेडा घातला जाऊ लागला. सर्व अटी शर्तींचे पालन केले असतानाही सातत्याने समित्या नेमून हस्तांतरणास खाेडा घालण्याचे काम केले जात आहे. आतापर्यंत या हाॅस्पीटलसाठी सुमारे १५० काेटी रुपयांचा खर्च केला आहे. कॅन्सरपासून ते ह्रदयविकारापर्यंत सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचारासाठी यंत्रणा तयार केली आहे. मात्र, ही सर्व यंत्रणा वापराविना पडून आहे. त्यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सुमारे ७५ हजार कर्मचाऱ्यांसह या भागातील नागरिकांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा मिळत नसल्याची खंत देशपांडे यांनी व्यक्त केली.