महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Panvel-Karjat Local Train : पनवेल ते कर्जत मार्गावर थेट लाेकल ट्रेन; दुहेरी रेल्वे मार्गासाठी ७४ टक्केच भूसंपादन! - panvel to karjat local train land acquisition

ठाणे-दिवा दरम्यान नव्या पाचव्या सहाव्या मार्गिका सुरू झाल्यानंतर आता काही वर्षात पनवेल ते कर्जत अशा थेट लोकल गाड्या सुरू होण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. ( Panvel to Karjat Local Train ) एमयुटीपी ३ मधील पनवेल-कर्जत या नवीन ५६ किमीच्या दुहेरी रेल्वे मार्गासाठी ७४ टक्के भूसंपादन झाल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) दिली.

74 percent land acquisition for panvel karjat local train
पनवेल ते कर्जत मार्गावर थेट लाेकल ट्रेन

By

Published : Feb 18, 2022, 6:42 AM IST

मुंबई -ठाणे-दिवा दरम्यान नव्या पाचव्या सहाव्या मार्गिका सुरू झाल्यानंतर आता काही वर्षात पनवेल ते कर्जत अशा थेट लोकल गाड्या सुरू होण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. ( Panvel to Karjat Local Train ) एमयुटीपी ३ मधील पनवेल-कर्जत या नवीन ५६ किमीच्या दुहेरी रेल्वे मार्गासाठी ७४ टक्के भूसंपादन झाल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) दिली. ( MRVC ) तर उर्वरित जागेचा भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात पनवेल ते कर्जत मार्गावर थेट लाेकल धावणार आहेत.

पनवेल ते कर्जत मार्गावर थेट लाेकल ट्रेन

२ हजार ७८३ काेटींचा खर्च -

पनवेल ते कर्जत एकच रेल्वे मार्ग असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या किंवा मालवाहतुकीसाठी त्याचा वापर होत असतो. कर्जत आणि पनवेलमधील प्रवासासाठी व्हाया ठाणे किंवा कुर्ला मार्गे लोकलने जावे लागते. अन्यथा रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडावा लागतो. मात्र, त्यात बराच वेळ जातो. याशिवाय या मार्गावरुन उपनगरीय रेल्वे वाहतूक होत नसल्याने किंवा अन्य शटल सेवाही नसल्याचा फटका येथील प्रवाशांना होत होता. त्यामुळे प्रवाशांचा सुविधेसाठी २०१५च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकल्पास हिरवा कंदील दाखवला. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मंजुरी दिली होती. पनवेल-कर्जत दरम्यान ५६ किमी नवीन उपनगरीय रेल्वे मार्गिकेला २ हजार ७८३ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च येणार आहे.

कोरोनाचा फटका -

काेरोनामुळे या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामे खोळंबली. जानेवारी २०२१ नंतर या कामांना सुरुवात झाली होती. दुहेरी मार्ग २०२२पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. प्रकल्पातील दुहेरी मार्गाचे काम करण्यासाठी सरकारी, खासगी आणि वन अशी १३५.८९३ हेक्टर जमीन आवश्यक आहे. यातील १०१.०९० हेक्टर म्हणजेच ७४.३९ टक्के भूसंपादन झाले असून २५.६१ टक्के भूसंपादन शिल्लक आहे. या प्रकल्पात पादचारी पुलांसह अन्य काही कामांना सुरुवात झाली आहे. या मार्गात तीन बोगदेही असून त्यासाठी निविदाही काढली आहे. यातील एक बोगदा २.६० किलोमीटर लांबीचा असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने दिली आहे.

हेही वाचा -Kirit Somaiya Visiting Korlai Alibag : कोर्लईला भेट देऊन सत्य समोर आणणार - किरीट सोमैया

रेल्वे मार्गाची वैशिष्ट -

या दुहेरी मार्गिकेमुळे पनवेल ते कर्जतदरम्यान राहणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा मिळणार आहे. प्रकल्पात पनवेल, चौक, मोहापे, चिखले, कर्जत अशी पाच स्थानके असतील. याशिवाय फलाट, पादचारी पूल, भुयारी मार्ग इत्यादी कामे मोठ्या प्रमाणात होणार आहेत. ३.१२ किलोमीटरचे तीन रेल्वे बोगदे असणार आहे. तर या ५६ किमीच्या दुहेरी रेल्वे मार्गावर रस्ते पाच उड्डाणपूल, दोन रेल्वे उड्डाणपूल, सहा मुख्य पूल आणि ३७ लहान पूल असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details