मुंबई : ख्रिसमस काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ख्रिसमस दरवर्षी 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून थाटामाटात साजरा करतात. जेव्हा आपण ख्रिसमसचा विचार करतो तेव्हा पहिल्या दोन गोष्टी लक्षात येतात सांता आणि दुसरे ख्रिसमस ट्री. या दिवशी ठिकठिकाणी ख्रिसमस ट्रीला सजवले जाते. याच दिवसात अनेकांची ख्रिसमस ट्री सजवण्याची स्पर्धा असते. प्रत्येकाला आपला ख्रिसमस ट्री हा अधिक आकर्षक दिसावा असे वाटत असते. मात्र, मुंबईतील एका व्यक्तीकडे तब्बल 70 फुटांचा ख्रिसमस ट्री ( 70 foot Christmas tree ) आहे आणि हा डगलस ट्री दरवर्षी दिवाळीपासून ते 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनापर्यंत ( Christmas Tree Stand Till January 26 Republic Day ) विविध रंगाच्या रोषणाईने सजलेला असतो.
लहानपणी लावले झाड : हा तब्बल सत्तर फुटांचा क्रिसमस ट्री आहे. वरळी येथे राहणाऱ्या डगलस सॅलदाना यांच्या घराबाहेर. ईटीव्हीशी बोलताना डकलस म्हणाले की, "आमचे एकत्र कुटुंब होते. इथे एक व्यक्ती राहायचा त्यांच्याकडे हा ख्रिसमस ट्री होता. त्यावेळी आम्ही खूप लहान होतो. त्यांनी त्यांची बाग साफ केली त्यावेळी त्यांनी हा ख्रिसमस ट्री कोणालातरी द्यायचा म्हणून काढून ठेवला होता. माझे वडील हे झाड आमच्या घरी घेऊन आले. तेव्हापासून मी आणि माझी बहीण याची काळजी घेत होतो. आम्ही रोज या झाडाला पाणी घालायचो, त्याची देखभाल करायचो आणि क्रिसमसच्या दिवसात या झाडाला उत्तम सजवायचे असा आमचा नित्यक्रम होता."