मुंबई- स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान, गिरगावतर्फे ७ हजार चौरस फुटांची रांगोळी साकारून वायुदलाला अनोखी सलामी देण्यात आली आहे. गुढीपाडव्यानिमित्त मुंबईकरांना ही अनोखी रांगोळी पाहायला मिळणार आहे.
मुंबईत गुढीपाडव्यानिमित्त ७ हजार चौरस फुटांची रांगोळी काढून वायुदलाला अनोखी सलामी
मुंबईत गुढीपाडव्यानिमित्त ७ हजार चौरस फुटांची रांगोळी साकारण्यात आली.
स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही अशाच प्रकारचे आयोजन करत लोकांच्या डोळ्याचे पारणे फेडेल, अशी महारांगोळी रेखाटण्यात आली आहे. रंगशारदाच्या संकुलावर ७ हजार चौरस फुटांची महारांगोळी काढण्यात आली आहे. गुढीपाडव्यानिमित्त मुंबईकरांसाठी ही रांगोळी मोठे आकर्षण ठरणार आहे.
या रांगोळीसाठी २०० किलो रांगोळी आणि ६०० किलो रंग वापरण्यात आले आहेत. २५ कलाकारांच्या ७ तासांच्या अथक प्रयत्नातून ही महारांगोळी साकारण्यात आली आहे. पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या वायुदलाच्या एअर स्ट्राईकला या रांगोळीतून मानवंदना देण्यात आली. त्यात अभिनंदनच्या शौर्याची गाथा या रांगोळीच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. तसेच गुढीपाडव्यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही स्वामी विवेकानंदन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.