मुंबई- निवडणूक आयोगाने शनिवारी महाराष्ट्र विधानसभेच्या तारखा जाहीर केल्या. त्यानंतर आचारसंहितेच्या पहिल्याच दिवशी मुंबई पोलिसांनी भुलेश्वर परिसरातून एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याकडून ६६ लाखांची रोकड पकडली आहे. ही रक्कम पकडून पोलिसांनी प्राप्तिकर विभागाकडे सुपूर्द केली असल्याचे लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी सांगितले आहे.
पैशाची हेराफेरी सुरू : मुंबईत पकडली ६६ लाखाची रक्कम, राजकीय कार्यकर्ता ताब्यात - मुंबई पोलिस
आचारसंहितेच्या पहिल्याच दिवशी मुंबई पोलिसांनी भुलेश्वर परिसरातून एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याकडून ६६ लाखांची रोकड पकडली आहे. ही रक्कम पोलिसांनी पकडून प्राप्तिकर विभागाकडे सुपूर्द केली असल्याचे लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी सांगितले आहे.
आचारसंहिता लागल्यावर एकत्रित पैशाची मोठी रक्कम आढळल्यास त्याची चौकशी होते. तसेच राजकीय पक्षाचा संबंध असल्यास त्यावर कारवाई देखील केली जाते. त्याच अनुषंगाने दक्षिण प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त निशित मिश्रा यांच्या विशेष पथकाने भुलेश्वरच्या पोफळवाडीमध्ये शनिवारी सायंकाळी छापा टाकला. पथकाला एका कार्यालयातून ६६ लाख रुपये सापडले. या परिसरात आणखी काही ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचीही माहिती आहे. निवडणुकीच्या कालावधीत रोख रकमेची छुप्या मार्गाने देवाणघेवाण केली जाते. हे रोखण्यासाठी मुंबई पोलीस राजकीय पक्ष, कार्यकर्ते यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून आहेत. त्यातच ही कारवाई झाली असून टाकलेल्या या छाप्यामध्ये हस्तगत केलेली रक्कम आणि त्याचा तपशील प्राप्तिकर विभागाला देण्यात आला आहे. अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी दिली आहे.