महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईतील रखडलेले रेल्वे प्रकल्प लागणार मार्गी; केंद्रीय अर्थसंकल्पात एमयूटीपी प्रकल्पासाठी 650 कोटींची तरतूद - केंद्रीय अर्थसंकल्प एमयूटीपी तरतूद

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात एमयूटीपीच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही तरतूद जास्त आहे.

Train
रेल्वे

By

Published : Feb 4, 2021, 6:59 AM IST

मुंबई - उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचा रोजचा प्रवास काहीसा सुखद, वेगवान आणि सुरक्षित होण्यासाठी अनेक प्रकल्प राबवले जात आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प (एमयूटीपी) हाती घेण्यात आले आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात एमयूटीपीच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. गेल्या 2020-21च्या अर्थसंकल्पात एमयुटीपीच्या प्रकल्पांसाठी 550 कोटींचा निधी देण्यात आला होता. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पांना आता चालना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

100 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद -

यंदाच्या अर्थसंकल्पात एमयूटीपी 3, एमयूटीपी 3 आणि 3 ए साठी निधी मंजूर करण्यात आला आहे. एमयूटीपी 2 साठी 200 कोटी, एमयूटीपी 3 साठी 300 कोटी तर एमयूटीपी 3 ए मधील प्रकल्पांसाठी 150 कोटी असे एकूण 650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. यंदा गेल्या वर्षी पेक्षा 100 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या रक्कमे इतकीच रक्कम राज्य सरकार देणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पांचे काम सुरू करणे एमआरव्हीसीला शक्य होणार आहे. याशिवाय उपनगरीय रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांवरील एकात्मिक सुरक्षा यंत्रणा, तिकीट यंत्रणा, पादचारी पूल, रेल्वे ट्रॅकची देखभाल आणि दुरुस्ती, प्रवासी सुविधांमध्ये सरकते जिने-लिफ्ट उभारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. सीवुड-बेलापुर-उरण रेल्वे मार्गाकरता यंदा फक्त 20 कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत. याशिवाय यार्डच्या रिमॉडेलिंगकरता देखील भरीव निधी देण्यात आला आहे. एटीव्हीएम, लिफ्ट, एक्सलेटरची संख्या वाढवण्यावर, चचर्गेट-विरार ट्रॅक दुरुस्तीवर भर देण्यात आलेला आहे.

कोणतेही नवीन प्रकल्प नाही -

यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतेही नवीन प्रकल्प जाहीर न करता सुरू असलेल्या, रखडलेल्या किंवा याआधी परवानगी मिळालेल्या प्रकल्पांना निधी देण्यास प्राधान्य दिले गेले आहे. निधी अभावी अनेक प्रकल्पांचे काम रेंगाळले होते. एमआरव्हीसीने रेल्वे बोर्डाकडे एमयुटीपीच्या प्रकल्पांना 750 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार एमयुटीपीच्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

एमयुटीपी 2 - 200 कोटी रुपये

(ठाणे ते दिवा 5-6वा मार्ग, मुंबई सेंट्रल ते बोरीवली 6वा मार्ग, सीएसएमटी-कुर्ला, 5- 6वा मार्ग)

एमयुटीपी 3 - 300 कोटी रुपये

(विरार ते डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत दुहेरी मार्ग, ऐरोली ते कळवा लिंक रोड, 47 वातानुकूलित लोकल गाड्या, रूळ ओलांडण्याचे प्रकार)

एमयुटीपी 3 ए - 150 कोटी रुपये

(सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग, 210 वातानुकूलित लोकल गाड्या, पनवेल ते विरार उपनगरीय मार्ग, सीबीटीसी नवीन सिग्नल यंत्रणा)

ABOUT THE AUTHOR

...view details