हैदराबाद- देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. काल (9 ऑगस्ट) भारतात 64 हजार 399 नवे कोरोना रुग्ण सापडल्याने कोरोना रुग्णांची एकूण संख्या 21 लाख 53 हजार 10 झाली आहे. यात 6 लाख 28 हजार सक्रिय रुग्ण असून 14 लाख 80 हजार 885 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. तसेच, काल दिवसभरात 861 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र-राज्यात पुन्हा गेल्या २४ तासात १२ हजार २४८ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, राज्यात काल (9 ऑगस्ट) आतापर्यंतच्या सर्वोच्च १३ हजार ३४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ५१ हजार ७१० रुग्ण बरे झाले आहेत. काल देखील नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६८.२५ टक्के एवढे आहे. सध्या १ लाख ४५ हजार ५५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल देखील राज्यभरात सर्वाधिक ७८ हजार ७० चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दिल्ली- प्रदेशात काल 1 हजार 300 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, एकूण रुग्णांची संख्या ही 1 लाख 45 हजार 427 इतकी झाली असून 1 लाख 30 हजार 587 रुग्णांमध्ये सुट्टी देण्यात आलेले, स्थलांतरित, आणि बरे झालेल्यांचा समावेश आहे. प्रदेशात 10 हजार 721 सक्रिय रुग्ण आहेत, तर 4 हजार 111 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, प्रदेशात चाचणीसाठी बाहेरून येणाऱ्या रुग्णांमुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याची माहिती आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे.
मध्य प्रदेश- राज्याचे मंत्री विश्वास सारंग यांना कोरोना झाला आहे. याबाबत त्यांनी स्वतहून काल ट्विटरवर माहिती दिली. दरम्यान, राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या ही 38 हजार पार गेली आहे.