मुंबई: केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या व्हर्च्यूअल उपस्थितीत 'Drug Trafficking and National Security' या विषयावर दिल्ली येथे आज महत्वाच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या आयोजनादरम्यान केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाश करण्यात येणाऱ्या मुद्देमालाचा आढावा घेतला. त्यावेळी दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी ४ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला एकूण १६१ किलो वजनाचा, अंदाजे किंमत ६४ करोड ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड या ठिकाणी बंदीस्त भट्टीमध्ये जाळून नष्ट करण्यात आला.
ड्रग्सची लावली विल्हेवाट: फेब्रुवारी महिन्यात मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाने वसईत मोठी कारवाई केली होती. वसईच्या पेल्हार गावातून १७२४ ग्रॅम हेरॉईन नावाचे ड्रग्स (अमली पदार्थ) जप्त केले होते. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात ५ कोटी इतकी किंमत आहे. या कारवाईत पोलिसांनी २ लाख ६० हजार रोख रक्कमही जप्त केली होती. एटीएसनेही अलीकडेच कारवाई केलेली आहे. अशाप्रकारे चार गुन्ह्यांमध्ये एटीएसने जप्त केलेल्या ड्रग्सची विल्हेवाट आज लावण्यात आली आहे.