मुंबई :राज्यामध्ये कॉपीमुक्त अभियान सुरू केले. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई सर्व विभागांमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याच्या काही घटना प्रसारमाध्यमांनी टिपलेल्या आहेत. बुलढाणामधील कॉपी करण्याच्या प्रकारामध्ये अनेक शिक्षक गुंतले असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई देखील माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने केलेली आहे. तसेच या कॉपी करण्याचे धागेदोरे अहमदनगर ते मुंबई असे सर्व दूर पसरल्याचे देखील त्यामध्ये समोर आलेले आहे. आता त्यात इयत्ता दहावीच्या महत्त्वाच्या परीक्षेचा हिंदीचा पेपर त्याला हजारो विद्यार्थी गैरहजर राहिल्यामुळे त्यांना फटका बसला आहे.
असंख्य विद्यार्थी परीक्षेला गैरहजर :दहावीचा हिंदी विषयाचा पेपर बुधवारी ८ मार्च रोजी होता. समाज माध्यमावर ‘नवनीत’सह इतर शैक्षणिक संस्थांच्या नावाने व्हायरल झालेल्या वेळापत्रकात मात्र तोच पेपर गुरुवारी ९ मार्च रोजी असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे असंख्य विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले. मुंबई विभागात हिंदीच्या पेपरसाठी २ लाख ५९ हजार १५३ जणांची नोंदणी होती. त्यापैकी २ लाख ५२ हजार ९८० विद्यार्थ्यांनी हा पेपर दिला. त्यामुळे तब्बल ६ हजार १७३ मुले गैरहजर राहिली.
नवनीत’कडून खुलासा :समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या वेळापत्रकांमध्ये ‘नवनीत’च्या नावाने प्रसिद्ध झालेल्या वेळापत्रकाचाही समावेश होता. त्याबाबत अनेक तर्क वितर्क केले गेले. नवनीतकडून त्यांनी खुलासा जाहीर केला. राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर केल्यानुसार वेळापत्रक छापले होते. या वेळापत्रकाखाली शाळेकडून देण्यात येणारे वेळापत्रक हेच अंतिम वेळापत्रक असेल. त्यावरून खात्री करून परीक्षेला प्रविष्ट व्हावे; अशी स्पष्ट सूचना दिली होती, असे नवनीत एज्युकेशन लिमिडेटने आपल्या खुलाशात नमूद केले आहे.
व्हाट्सअपवरून पेपर व्हायरल :राज्यात 14 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी बसलेले आहेत. विद्यार्थ्यांनी आपापली मेहनत करून पेपर प्रामाणिकपणे लिहावे हे जितकेच खरे आहे. तितकेच कॉपी करण्याचे प्रकार देखील दिवसेंदिवस वाढू लागलेले आहेत. राज्य शासनाने निर्देश दिले. महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने त्या संदर्भात कठोरपणे नियम देखील लावले होते. जसे की, संपूर्ण विद्यालयाच्या परिसरामध्ये कुठलेही गॅझेट कुठल्याही विद्यार्थ्याला नेता येणार नाही. मात्र तरीही बुलढाणा या ठिकाणी व्हाट्सअपवरून पेपर व्हायरल झाला. मुंबईमध्ये देखील तीन दिवसांपूर्वी पेपर व्हायरल झाला आणि डिसिलवा या शाळेमधील ही घटना घडल्यानंतर त्याबाबत गुन्हा ही नोंदवण्यात आला. या घटना सरत नाही तोपर्यंतच आता हा नवीन फटका पुन्हा शिक्षण क्षेत्राला बसला आहे.