मुंबई -देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात कोरोनाची रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रविवारी मुंबईत 9 हजार 958 नविन कोरोनाबाधित आढळले तर, 51 कोरोना रूग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबई शहरात कलम 188 नुसार धडक कारवाई केली जात आहे. मुंबई पोलिसांनी 20 मार्च 2020 ते 11 एप्रिल 2021 या काळात तब्बल 60 हजार 66 जणांवर कलम 188चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
60 हजार 66पैकी 9 हजार 201व्यक्ती फरार असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत. आतापर्यंत 23 हजार 352 आरोपींना मुंबई पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. 27 हजार 513 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केलेली आहे.
उत्तर मुंबई नियम मोडण्यात आघाडीवर -
कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये मुंबईत हॉटेल व इतर आस्थापने विहित वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू ठेवणे, पान टपरी व इतर दुकाने सुरू ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, अवैध वाहतूक, मास्क न लावणे याबाबत विविध ठिकाणी कारवाया करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांकडून मुंबईतील दक्षिण, मध्य, पूर्व, पश्चिम, उत्तर अशा सर्व विभागांमध्ये कारवाया झाल्या आहेत. दक्षिण मुंबईत 6 हजार 582 गुन्हे दाखल करण्यात आले असून मध्य मुंबईत 2 हजार 964, पूर्व मुंबईत 4 हजार 841, पश्चिम मुंबईत 3 हजार 994 तर उत्तर मुंबईत सर्वाधिक 10 हजार 900 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.