मुंबई - शहरात कोरोनाचा प्रसार होण्यापूर्वी महापालिका रोज १४ हजार किलो जैविक कचरा दरदिवशी गोळा करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावत होती. कोरोना दरम्यान जैविक कचऱ्यात वाढ झाली असून सध्या दिवसाला २१ हजार किलो कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. आतापर्यंत ६० लाख किलो कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट -
मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रसार होऊ लागला. कोरोना हा संसर्गजन्य असल्याने कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत रुग्णांवर उपचारांसाठी पीपीई किट्स, मास्क, गॉगल, रुग्णालयातील साहित्य आणि इतर वस्तूंचा वापर दररोज केला जातो. या गोष्टींच्या संपर्कात आल्यानेही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे एकदा वापरल्यानंतर या वस्तूंची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी लागते. कोरोनाच्या संकटात निर्माण होणाऱ्या या जैविक कचऱ्याच्या संख्येत हजारो किलोंनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
दिवसाला २१ हजार किलो कचरा -
महापालिकेने फेब्रुवारी महिन्यापासून हा कचरा स्वतंत्रपणे जमा करण्यास पालिकेने सुरुवात केली. या महिन्यात दिवसाला सरासरी १४ हजार किलो जैविक कचरा निर्माण होत होता. फेब्रुवारी महिन्यात एकूण ४ लाख ४ हजार ३२४ किलो एवढा जैविक कचरा जमा झाला होता. नोव्हेंबरपर्यंत हे प्रमाण आता दिवसाला २१ हजार किलोपर्यंत पोहोचले आहे. नोव्हेंबरमध्ये ७ लाख किलो जैविक कचरा जमा झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. कोरोना रुग्णालय, बाधित इमारती, वसाहतींमध्ये गेल्या काही दिवसांत जैविक कचऱ्यात मोठी वाढ झाली आहे.
६० लाख किलो कचऱ्याची विल्हेवाट -
महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीतून जैविक कचरा संकलित केला जातो. संशयित रुग्णांच्या इमारती व वसाहतींमधील कचऱ्याची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावण्यात येत आहे. यापूर्वी प्रतिदिन जमा होणारा १४ हजार किलो कचरा आता २१ हजार किलोपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत सुमारे ६० लाख किलो कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यात आली आहे.
कोरोना काळातील जैविक कचरा, महिना (कचरा किलोमध्ये)
फेब्रुवारी ४ लाख ४ हजार ३२४
मार्च ३ लाख ४८ हजार १३९
एप्रिल ३ लाख ९० हजार ३३५
मे ५ लाख ४६ हजार ५५१
जून ६ लाख ६० हजार ६९९
जुलै ७ लाख ३ हजार ६४९
ऑगस्ट ७ लाख ७७ हजार ५७९
सप्टेंबर ७ लाख ४४०
ऑक्टोबर ६ लाख ७७ हजार १११
नोव्हेंबर ७ लाख