मुंबई - कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका विवाहित महिलेला कामाच्या बहाण्याने गुजरातमार्गे राजस्थानमध्ये नेऊन २ लाख रुपयांना विकणार्या टोळीच्या मुसक्या कुरार पोलिसांनी आवळल्या आहेत. पोलिसांनी या संदर्भात तत्काळ तपास करत पीडित महिलेची सुटका करून 6 आरोपींना अटक केली आहे.
कुरार परिसरात राहणाऱ्या कुसुम नावाच्या महिलेने पीडित महिलेला गुजरातमधील सूरत या ठिकाणी 5 नोव्हेंबर रोजी नेले होते. गुजरात आणि राजस्थानमध्ये केटरिंगची भरपूर कामे मिळतात. त्यामुळे, तुला पैसे अधिक मिळतील असे आमिष सदर महिलेने पीडित महिलेला दिले होते. यादरम्यान पीडित महिलेची ओळख राजू व विजय या एजंटशी करून देण्यात आली.
काम मिळवून देण्याच्या बहाण्यानेच पीडित महिलेला मुंबईतून सूरतला आणण्यात होते. त्यानंतर तिला राजस्थानमध्ये आणून, त्या ठिकाणी मुकेश नावाच्या व्यक्तीला २ लाख रुपयांचा सौदा करून तिचा जबरदस्तीने राजस्थानमध्ये विवाह लावून दिला होता. या महिलेवर सतत लैंगिक अत्याचार करण्यात आले. काही दिवसांपूर्वी पीडित महिलेने राजस्थानमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिला पुन्हा पकडून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर ठार मारू अशी धमकी देण्यात आली होती.