मुंबई : आज आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुंबई महापालिकेत घोटाळे वाढले आहेत. वारंवार पत्रव्यवहार करुनही कारवाई होत नाही. या सर्व प्रकरणाची आणि मुंबई मनपा आयुक्तांची लोकायुक्तांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन केली. शिवसेना सचिव अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी, आमदार अनिल परब असे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पळून जातात :गेल्या सहा सात महिन्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे अनेक भ्रष्टाचार लोकांसमोर आणलेले आहेत. राज्यपालांना या सर्व प्रकरणाची माहिती दिली. मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक हे या सगळ्याला जबाबदार आहेत. बिल्डर कॉट्रॅक्टर यांचे सरकार सत्तेत बसले आहे. रस्त्यांचा मेगा टेंडर घोटाळा, खडी मक्तेदारी घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा झाला आहे. ६ हजार कोटींचा रस्ता घोटाळा झाला. १० रस्त्यांची कामे देखील अद्याप सुरू झालेली नाहीत. गद्दार गॅंग सोडली तर सगळ्यांनी तक्रारी केल्या. मात्र अद्याप कारवाई नाही झालेली आहे. लोकशाही धाब्यावर बसवली जात आहे. आर्थिक गैरव्यवस्थापन आणि कंत्राटदारांना प्रशासनाकडून खिरापत वाटली जात आहे. तक्रारी केल्यानंतर मुख्यमंत्री पळून जात आहेत. कधी शेतात तर कधी गुवाहाटी कुठेही निघून जात असल्याचा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.